महाराष्ट्राला अजून शिवाजी महाराज कळालेले नाहीत- बाबासाहेब पुरंदरे
![Maharashtra still does not know Shivaji Maharaj - Babasaheb Purandare](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/shivaji-maharaj.jpg)
मुंबई |
आज आपल्याला शिवाजी महाराज फार थोडे कळाले आहेत. शाहिस्तेखान, पावनखिंड, गड आला पण सिंह गेला एवढ्यापुरतंच आम्हाला शिवचरित्र माहिती आहे असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडले आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. “आज आपल्याला शिवाजी महाराज फार थोडे कळतात. आम्हाला फक्त चित्र कळलं आहे, चारित्र्य कळालेलं नाही. शाहिस्तेखान, पावनखिंड, गड आला पण सिंह गेला एवढ्यापुरतंच आम्हाला शिवचरित्र माहिती आहे. पण त्यांनी ज्या लोकांच्या नित्य उपयोगाच्या गोष्टी केल्या आहेत त्या माहिती आहेत का?. त्या माहिती पाहिजेत,” असे बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटले आहे.
मराठी माणसाला शिवाजी महाराज कळले आहेत का असा सवाल बाबासाहेब पुरंदरे यांनी करण्यात आला होता. यावेळी त्यांनी १२ १५ वर्षाचे महाराज सुद्धा कळलेले नाहीत. महाराजांचे वय १२ वर्ष होतं तेव्हा त्यावेळी त्यांनी जे केलं ते सुद्धा आम्हाला कळलेलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. गडकिल्ल्यांबाबत शासनाची, राज्यकर्त्यांची अनास्था का आहे असं विचारलं असता बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, “ज्याला हौस नाही त्यानं लग्न करु नये अशी आपल्याकडं म्हण आहे. या म्हणीप्रमाणं माणूस हौशी पाहिजे, नवीन करण्याची हौस पाहीजे. शिवाजी महाराजांना ती हौस होती, त्यामुळं त्यांनी गडकिल्ले बांधले. आता ती हौस जागी करण्याचं काम आपल्या अभ्यासकांनी करायला हवं.” यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी देखील सांगितल्या. शालेय जीवनातील करामतींमुळं मोठ्या लोकांचा मार खाल्ला असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. त्यांनी त्यांच्या शिक्षकांबद्दलही आठवणी सांगितल्या.