अलमट्टीमुळे उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर महाराष्ट्र – कर्नाटक एकत्रित प्रयत्न

कोल्हापूर: अलमट्टीमुळे पूरस्थिती तयार होऊ न देण्यासाठी महाराष्ट्र – कर्नाटक दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवत एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. दरवर्षी पावसाळ्यात तयार होणाऱ्या या पूरस्थितीवर मात करण्यासाठी, उपाययोजना ठरवण्यासाठी आयोजित आंतरराज्य बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंचगंगा व कृष्णा नदीतील पाण्याची पातळी आणि अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापन, धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती तसेच आंतरराज्य समन्वय यावर प्रामुख्याने चर्चा झाली. दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनांनी एकत्र येऊन पूर व्यवस्थापनासाठी ठोस योजना आखण्याचे ठरवण्यात आले.
हेही वाचा – निर्मला गवित यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विजापूरचे जिल्हाधिकारी संबित मिश्रा, कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी.एच. पाटोळे, अलमट्टी धरणाचे प्रमुख अभियंता, अन्य अधिकारी उपस्थित होते.
अलमट्टी धरणातून किती, कधी विसर्ग होणार याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल. पाणीपातळीची देवाणघेवाण व अन्य उपाययोजनांच्या अनुषंगाने कर्नाटक राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचे प्रतिनिधी वारणा, कोयना धरण व राजापूर बंधाऱ्याच्या ठिकाणी तर सांगलीचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी आलमट्टी धरणाच्या ठिकाणी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणार. पूर परिस्थिती ओढवल्यास चारही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एकत्रितपणे काम करतील. संभाव्य पूरस्थितीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी इशारा व्यवस्था प्रभावी करण्यात येणार आहे.