निर्मला गवित यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश

नाशिक : उद्धवसेनेला गेल्या काही महिन्यात सत्ताधारी पक्षांकडून विशेषत: शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून खिंडार पाडले जात आहे. अनेक मातब्बर नेत्यांनी भाजप व शिंदेसेनेत पक्षात प्रवेश केला आहे. आता नाशिकमधून उद्धवसेनेला शिंदेसेनेने धक्का दिला असून इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
दोन दिवसापूर्वीच नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता महिला नेत्या निर्मला गावितांनी पक्षाला रामराम केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होत आहे. गावित या इगतपुरी मतदारसंघातून दोन टर्म आमदार होत्या. 2019 मध्ये त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यांचा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. निर्मला गावित यांचे वडील माणिकराव गावित हे सलग 9 वेळा लोकसभेचे खासदार झाले होते.
हेही वाचा – अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. त्या ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.