‘महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दावोस : भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री श्री.फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
हरित ऊर्जा, अन्न प्रक्रिया, पोलाद निर्मिती, आयटी-आयटीईस, डाटा सेंटर्सह ईव्ही- ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातील ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागात पोहोचणार असल्याने, तेथे उद्योग वाढीसह मोठ्या प्रमाणा रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे प्रतिनिधीमंडळ दावोस येथे उपस्थित आहे. दावोस मधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरु केले. यातून गुंतवणुकीचा मोठा ओघ सुरु झाल्याने महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उत्साहाचे चित्र निर्माण झाले.
तत्पूर्वी, दावोस मधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.’ भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज, विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला, उद्योग विश्वाला साद घालत आहे, अशी मनोदय भावनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा –पीएमएवायमधील घरांसाठीचे सामाजिक आरक्षण लवकरच रद्द; म्हाडाकडून धोरणात्मक निर्णयासाठी हालचाली सुरू
सामंजस्य करारांवरील स्वाक्षरी व करारांच्या आदान-प्रदान प्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा, गुंतवणुकदारांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. येथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
‘उद्योजक – गुंतवणूकदारांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, यंदा गतवर्षीहून अधिक गुंतवणूक आणि रोजगार संधीचे सामंजस्य करार होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषतः मुंबईतील घन कचरा व्यवस्थापन, हवा आणि पाणी गुण संनियत्रणाच्या माध्यमातून सर्क्युलर ईकॉनॉमीची संरचना उभी केली जात आहे. तसेच महाराष्ट्र हे अमर्याद संधीचे राज्य आहे. त्याबाबत आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासासह, तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने आराखडा निश्चित करून दिला आहे. या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निमिर्तीवर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, आगामी दोन दिवसात दावोसमध्ये एआय़, क्वांटम कंम्प्युटींग, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यांसह फिनटेक, लॉजिस्टिक्स अँण्ड इन्फ्रास्ट्रक्चर तसेच जहाज बांधणी, ईव्ही, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी, बोलणी -चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष (MAITRI) या गुंतवणूक आणि उद्योग सुलभतेला प्रोत्साहन देणाऱ्या समर्पित संस्थात्मक व्यवस्थेमुळे यंदा गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्राचा महाराष्ट्राकडील ओघ आणखी वाढला आहे.




