Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

फेब्रुवारीत दोन नवीन मेट्रो मार्गिका सेवेत; ‘मेट्रो २ ब’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

मुंबई : मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका सेवेत असून आता लवकरच आणखी दोन मेट्रो मार्गिकांची त्यात भर पडणार आहे. ‘अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले आणि ‘दहिसर – मिरारोड मेट्रो ९ मार्गिके’तील दहिसर – काशीगाव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे. दहिसर – मंडाले टप्प्याला याआधीच सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

आता सोमवारी दहिसर – काशीगाव टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हे दोन्ही टप्पे एकाच दिवशी सेवेत दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या नवीन दोन मार्गिका सेवेत दाखल झाल्यास मानखुर्दवासियांचे, पूर्व उपनगरवासियांचे, तसेच मिरारोडवासियांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

एमएमआरडीए ‘मेट्रो २ ब’सह अन्य काही मेट्रो मार्गिकांची कामे करीत आहे. ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ९’ मार्गिकांतील पहिल्या टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडालेदरम्यानच्या ५.३ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून तात्पुरते सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. लवकरच अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार आहे. या टप्प्याचे लोकार्पण याधीच होणे अपेक्षित होते. मात्र आधी तांत्रिक कारणाने आणि त्यानंतर पालिका आचारसंहितेमुळे लोकार्पण रखडले. पण आता मात्र फेब्रुवारीमध्ये या टप्प्याचे लोकार्पण करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हा टप्पा सेवेत दाखल करतानाच ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव या ४.५ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचेही लोकार्पण त्याच दिवशी होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दहिसर – काशीगाव टप्प्याला सोमवारी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यामुळे ‘मेट्रो २ ब’ आणि ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील पहिला टप्पा एकाच दिवशी सेवेत दाखल केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – पीएमएवायमधील घरांसाठीचे सामाजिक आरक्षण लवकरच रद्द; म्हाडाकडून धोरणात्मक निर्णयासाठी हालचाली सुरू

मंडाले – डायमंड गार्डन असा पहिला टप्पा सुरू झाल्यास पूर्व उपनगरातील पहिली आणि मुंबईतील सेवेत दाखल होणारी ही पाचवी मेट्रो मार्गिका ठरणार आहे. या मार्गिकेमुळे मंडाले – डायमंड गार्डन प्रवास अवघ्या काही मिनिटांत करणे शक्य होणार आहे. त्याचवेळी ‘मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर – काशीगाव हा पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यास मुंबईतील सहावी आणि मुंबई महानगर प्रदेशातील सेवेत दाखल होणारी पहिली मेट्रो मार्गिका असणार आहे. या मार्गिकेमुळे दहिसर – काशीगाव प्रवास अतिजलद, सुकर होणार आहे. दरम्यान, ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण २६ जानेवारी रोजी होईल अशी चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी दावोस दौऱ्यावर आहेत. ते २४ जानेवारी रोजी परतणार आहेत. त्यामुळे २६ जानेवारी रोजी लोकार्पण होणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत मुंबईतील महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत मेट्रोच्या लोकार्पणाला मुहूर्त मिळणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता असून याच दिवशी दहिसर – काशीगावदरम्यानही मेट्रो धावेल अशी चर्चा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button