नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन; लातूरमधून दोन शिक्षक ताब्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-32-1-780x470.jpg)
NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात नवेनवे खुलासे होत आहेत. आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेला आहे. या प्रकरणात बिहार कनेक्शन समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे.
दोन शिक्षकांना नांदेड एटीएसने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत असून दोघेही जिल्हा परिषदेत शिक्षक आहेत.
हेही वाचा – आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली
नांदेड एटीएसने ताब्यात घेतलेल्यांची संजय जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी नावं आहेत. पेपरफुटी प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय एटीएसला आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात लातूर शहराचा काही धागेदोरे असण्याची शक्यता होती. त्या अनुषंगाने तपास सुरू होताच नांदेड एटीएसने या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, लातूरमध्ये वास्तव्यास असणारे संजय जाधव मूळचे चाकूर तालुक्याच्या बोथी तांडाचे रहिवासी आहेत. ते सध्या सोलापुरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. जलील उमरखाँ पठाण हे लातूरच्या अंबाजोगाई रोड परिसरात राहत असून कातपूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. हे दोन्ही शिक्षक लातुरामध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवत होते, अशी माहिती आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.