बिबट्या दत्तक योजनेची गरज : प्रताप सरनाईक
राष्ट्रीय उद्यान उभारल्यास प्राणी हल्ले करणे थांबवू शकतात
मुंबई : बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंजली टाकच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (ता. २३) दुपारी २ वाजता के.ई.एम रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी अंजलीवरील उपचारांची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा केली. वाढत्या बिबट्यांच्या संख्येला सामावून घेण्यासाठी दत्तक योजना राबवून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून ५० ते १०० एकरांचे छोटे राष्ट्रीय उद्यान उभारल्यास, हे प्राणी लोकांवर हल्ले करणे थांबवू शकतात, असेही सरनाईक यांनी नमूद केले.
मंत्री सरनाईक म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्य हे मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिका क्षेत्राभोवती असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका सतत वाढत आहे. या दोन्ही अभयारण्यांमध्ये अंदाजे ५५ ते ६० बिबटे आहेत. या बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच बिबट्या जंगलातून बाहेर पडल्यास तत्काळ सूचना देण्यासाठी त्यांच्यावर जीपीएस चिप्स बसवाव्यात. प्रत्येक चिपची किंमत सुमारे पाच लाख रुपये असू शकते, याविषयी मंत्रिमंडळातही चर्चा होणार आहे.’
हेही वाचा : ठाकरेंची युती म्हणजे जणू काही पुतिन-झेलेन्स्कीच एकत्र; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
अंजलीच्या उपचारात कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. या वेळी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, प्लॅस्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी आणि त्यांची टीम उपस्थित होती.
नसबंदी उपाय नाही
महाराष्ट्रामध्ये दोन हजार बिबटे असल्याचे नमूद करत सरनाईक यांनी सांगितले की, ‘बिबट्यांची नसबंदी करणे हा उपाय नसल्याने, ‘वनतारा’सारख्या संस्थांना बिबट्यांची काळजी घेण्याचे काम सोपवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दुबई यांसारख्या इतर देशांमध्ये असे प्रयत्न केले जातात.’





