Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

कोयना, भंडारदरा भरलं; पुण्यातील तीन धरणं १०० टक्के भरली तर नाशिकमधील धरणांमधूनही विसर्ग सुरु

पुणे |

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. तसेच पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच या सततच्या पावसाने मुंबईकर, पुणेकर, नाशिकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. कोयना, भंडारदरा यासारखी महत्वाची धरण ओव्हर फ्लो झाली आहे. कोयनाचे सहा दरवाचे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. तर पुण्यामधील पानशेत, वरसगाव, भाटघर धरणं १०० टक्के भरली आहेत.

  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, तीन धरणं १०० टक्के भरली…

पुणे पसिरसातील खडकवासला धरण ९७ टक्के भरलं आहे. पानशेत, भाटघर आणि वरसगाव धरणं १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९९ टक्के भरलं आहे. त्यामुळेच दरवर्षी पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या पुणेकरांना या वर्षी तरी पाण्याची चिंता करण्याची गरज लागणार नसल्याची चिन्हं दिसत आहेत. खडकवासलामधून ६ हजार ८४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. विसर्गामुळे पाणी पातळी तुलनेने मोठ्या प्रमाणात वाढणार नसली तरी नदीकाठ परिसरात सतर्क राहावे, असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे.

  • कोयनाचे सहा दरवाजे उघडले

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठीही सर्वत्र संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळेच कोयना धरणाचे दरवाजे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोयना काठच्या गावांना सतर्कचे इशारा देण्यात आलाय.

  • नाशिकमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग…

नाशिक जिल्ह्यामधील धरणांमधूनही मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक म्हणजेच १३ हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे. गंगापूर धरणातून १ हजार ५०० तर दारणा धरणातून १२ हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे. कडवा धरणामधून २ हजार २०० आणि आळंदी धरणातून ३० क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. याशिवाय वालदेवी धरणातून १३० क्युसेक पाणी सोडलं आहे.

  • भंडारदरा भरलं…

उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असणारे भंडारदरा धरणही भरलं आहे. धरणामधून साडेतीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. अकोले, संगमनेर, रहाता,श्रीरामपूर या तालुक्यांतील हजारो एकर शेतीला पाणी पुरविणाऱ्या या धरणावर अनेक साखर कारखाने, दूध संघ यांचे भवितव्य या धरणावर अवलंबून आहे.

  • अजून काही दिवस पाऊस…

धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असता तरी अजून काही दिवस पाऊस कायम राहणार असल्याने धरणांमधील पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे. पोषक वातावरणामुळे राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्याच्या काही भागांत १३ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button