Paris Olympics 2024 | कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने जिंकले ऑलिम्पिक मेडल, भारताला तिसरं पदक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Swapnil-Kusale--780x470.jpg)
Swapnil Kusale | मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने नेमबाजीत कांस्यपदक पटकावले आहे. स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. स्वप्नील खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत.
५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात एकूण ३ प्रकारे शूटिंग केली जाते. उभं राहून, गुडघ्यावर बसून आणि पोटावर झोपून अशाप्रकारे शूटिंग केली जाते. स्वप्निलने या प्रकारात चमकदार कामगिरी करत आधी कांस्य पदक निश्चित केलं. त्यामुळे स्वप्निलला रौप्य पदकाची संधी होती. मात्र रौप्य पदकाने अवघ्या काही पॉइंट्सने हुलकावणी दिली.
हेही वाचा – पूजा खेडकर यांचे लैंगिक छळाचे आरोप; जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले..
विजयानंतर स्वप्नील म्हणाला, मला रेंजवर शांत आणि संयमी राहायला आवडते. मी फारसा बोलत नाही. अचूक नेमबाजीसाठी शांत आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी धोनीचा प्रचंड चाहता आहे. क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना कितीही मोठे दडपण असले, तरी धोनीचा संयम सुटलेला कधीही पाहिला नाही. मलाही असेच राहणे आवडते, असेही स्वप्निल म्हणाला.