वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत भारताची नवव्या स्थानावर झेप…

नवी दिल्ली : भारताने वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. इंडोनेशियात बाली इथं अन्न आणि कृषी संघटनेने ही जागतिक वन संसाधन मूल्यांकन २०२५ क्रमवारी जाहीर केली. सर्वाधिक जास्त वनक्षेत्र विकसित करणाऱ्या देशांना या क्रमवारीत स्थान मिळतं. गेल्या वर्षी या क्रमवारीत भारताला दहावा क्रमांक मिळाला होता. यंदा त्यात सुधारणा झाल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे.
बाली येथे अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) जारी केलेल्या जागतिक वन संसाधन मूल्यांकन (जीएफआरए) २०२५ नुसार, जागतिक पर्यावरण संवर्धनात भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. जागतिक स्तरावर एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत भारत ९ व्या स्थानावर पोहोचला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘एक्स’ वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये या विकसात्मक बाबीची माहिती दिली. मागील मूल्यांकनात, भारत १० व्या क्रमांकावर होता. वार्षिक वनक्षेत्र वाढीच्या बाबतीत देशाने जगभरात आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे, ज्यामुळे शाश्वत वन व्यवस्थापन आणि पर्यावरणीय संतुलनाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा दिसून येते, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – महायुतीच्या मंत्र्यांचे टेन्शन वाढलं, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
यादव यांनी नमूद केले की, ही उल्लेखनीय प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारची धोरणे आणि कार्यक्रमांचे यश अधोरेखित करते. या सर्वांचा उद्देश वन संरक्षण, वनीकरण आणि समुदायाच्या नेतृत्वाखालील पर्यावरणीय कृती हा आहे.
पंतप्रधानांनी केलेले ‘एक पेड मां के नाम’ हे आवाहन आणि पर्यावरणविषयक जाणीवेवर त्यांनी सतत भर दिल्याने देशभरातील लोकांना वृक्षारोपण आणि वृक्ष संरक्षणात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आहे.
वाढत्या सार्वजनिक सहभागामुळे हिरव्या आणि शाश्वत भविष्यासाठी सामूहिक जबाबदारीची तीव्र भावना निर्माण होत आहे. मोदी सरकारच्या वन संरक्षण आणि संवर्धनासाठीच्या नियोजन आणि धोरणांमुळे आणि राज्य सरकारांच्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण सबंधी प्रयत्नांमुळे हे यश मिळाले आहे, असे ते म्हणाले.




