कृत्रिम तलावातील विसर्जनाला वाढता प्रतिसाद ; एकूण ६० हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन
![Increasing response to artificial lake discharge; Immersion of more than 60 thousand Ganesha idols in totalIncreasing response to artificial lake discharge; Immersion of more than 60 thousand Ganesha idols in total](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/artificial-pond.jpg)
मुंबई | दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असून शुक्रवारी पहाटे ६ वाजेपर्यंत दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पहाटेपर्यंत एकूण ६०,४७३ मूर्तींचे विसर्जन झाले. करोना आणि टाळेबंदी नसली तरी कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास प्रतिसाद वाढला आहे. यावेळी २४,३८२ मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.
दोन वर्षांच्या टाळेबंदीनंतर यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत आहे. दरवर्षी पालिका गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करते. मात्र कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यास गणेशभक्तांकडून तुलनेने प्रतिसाद कमी होता. टाळेबंदी व करोनाच्या काळात मात्र कृत्रिम तलावातच विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे कृत्रिम तलावांची संख्याही मुंबईत वाढवण्यात आली व त्यामध्ये मोठ्या संख्येने मुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदाही पालिकेने मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे असून गेल्यावर्षी १७३ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते.
यंदा १६२ तलाव तयार केले आहेत. यंदा टाळेबंदी, निर्बंध नसतानाही पर्यावरणाचा विचार करता गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावतच करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.
टाळेबंदीच्या काळात विसर्जनासाठी आलेल्या मूर्तींची संख्याही कमी झाली होती. अनेकांनी घरीच विसर्जन केले होते, तर सार्वजनिक गणपतीचे विसर्जन मात्र दीड दिवसातच करण्यात आले होते. यावर्षी मात्र घरगुती गणेश मूर्तींची संख्या करोना पूर्व काळाप्रमाणे ६० हजारापुढे गेली आहे. तर कृत्रिम तलावात पूर्वी साधारण १५ हजार मूर्ती विसर्जित होत होत्या यावर्षी त्यात वाढ होऊन ही संख्या २४ हजारावर गेली आहे.
मुंबईत पहाटे सहा वाजेपर्यंत एकूण ६०,४७३ गणेशमूर्तीं आणि ६७ हरतालिकांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात ६०,१२२ घरगुती तर २८४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात २४,३८२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात २४१९६ घरगुती तर १७२ सार्वजनिक गणेश मूर्ती होत्या.