राज्यात दुकाने आणि हॉटेल्सची वेळ मर्यादा वाढवली, सरकारचा मोठा निर्णय
![Increased the time limit of shops and hotels in the state, a big decision of the government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/food-hotels.jpg)
मुंबई – कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आता हळूहळू शिथिलता येत आहे. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स च्या वेळा वाढवून देण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यानुसार आता राज्यात रात्री १२ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार आहेत. तर सर्व प्रकारची दुकाने रात्री अकरा पर्यंत सुर ठेवता येणार आहेत. यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमावली सरकारने जाहीर केली आहे.
सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे सरकारने निर्बंध शिथीलकरणाचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारने राज्यातील सर्व उपहारगृहे तसेच हॉटेल्स रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच इतर दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापरी तसेच सेवा क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी मिळण्यास मदत होणार आहे. सर्वांनी या नव्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याआधी मुंबईतील हॉटेल्स रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा 18 ऑक्टोबर रोजी देण्यात आली होती. याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती.