अटल सेतूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; हायटेक ORT टोलद्वारे होणार कलेक्शन?
![Inauguration of Atal Setu by Prime Minister Modi; Hitech ORT collection through toll?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Atal-Setu-Toll-780x470.jpg)
Atal Setu Toll | देशातील सर्वात मोठ्या शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतील शिवडी येथून चालू होणारा हा ब्रिज रायगड तालुक्यातील उरण येथील न्हावा शेवा गावात संपणार आहे. एकूण २१.८ किलोमीटर लांबीचा हा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक आहे.
शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू या ब्रिजचा १६.५० किमीचा मार्ग समुद्रात आणि ५.५ किमीचा मार्ग जमिनीवर आहे. अटल सेतू हा ६ पदरी सागरी ब्रिज आहे. तब्बल १८ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या ब्रिजच आज उद्धाटन होत आहे. उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे २ तासाच अंतर अवघ्या २० मिनिटात पार करता येणार आहे.
अटल सेतूवरुन या वाहनांना परवानगी नसणार
दुचाकी, मोपेड, तीन चाकी वाहन, ऑटो, ट्रॅक्टर, बैलगाडी आणि धीम्या गतीने धावणाऱ्या वाहनांना या ब्रिजवर प्रवेश नसणार आहे.
अशाप्रकारे होणार हायटेक ORT टोल कलेक्शन?
शिवडी-न्हावा शेवा सागरी पुलावर टोलिंगची अत्याधुनिक पद्धत असणार आहे. या ब्रिजवर ORT म्हणजे ओपन रोड टोलिंग असणार आहे. अटल सेतूवर अत्याधुनिक स्कॅनर्स आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ते या मार्गावरुन वेगात पळणाऱ्या वाहनांना हेरुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल कलेक्शन करतील.
हेही वाचा – Kalki 2898 AD | प्रभासच्या ‘कल्कि २८९८ एडी’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
अटल सेतूसाठी नेमका किती टोल ?
कार/चारचाकी : चारचाकी वाहनांच्या एकेरी वाहतुकीसाठी अटल सेतूवर एका बाजूना वाहतुकीसाठी २५० तर दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी ३७५ रुपये इतका टोल आकारण्यात येईल. दैनंदिन पाससाठी ६२५ तर मासिक पाससाठी १२ हजार ५०० रुपये असा दर आकारण्यात येणार आहे.
मिनीबस : छोट्या बसेससाठी एका बाजूने ४०० तर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी ६०० रुपये टोल आकारला जाईल. दैनंदिन पाससाठी १ हजार तर मासिक पाससाठी २० हजार रुपये इतका दर आकारला जाईल.
छोटे ट्रक/वाहने (२ एक्सेल) : छोट्या ट्रकसाठी एका बाजूच्या वाहतुकीसाठी ८३० तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १२४५ रुपये इतका टोल आकारला जाईल. त्यात दैनंदिन पाससाठी २०७५ तर मासिक पाससाठी ४१ हजार ५०० रुपये इतका दर आकारला जाणार आहे.
एमएव्ही (३ एक्सेल) : या प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुकीला ९०५ रुपये तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १३६० रुपये इतका टोल भरावा लागेल. दैनंदिन पाससाठी २२६५ तर मासिक पाससाठी ४५ हजार २५० रुपये इतका दर आकारला जाईल.
मोठे ट्रक/वाहने (४-६ एक्सेल) : या प्रकारच्या वाहनांना एका बाजूने १३०० रुपये तर दोन्ही बाजूंसाठी १९५० रुपये इतका टोल भरावा लागेल. तर दैनंदिन पाससाठी ३२५० रुपये आणि मासिक पाससाठी ६५ हजार रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे.
अवजड वाहने : या श्रेणीतील वाहनांसाठी अटल सेतूवर एका बाजूने १८५० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंसाठी हाच दर २३७० इतका आहे. या वाहनांना दैनंदिन पास हवा असल्यास त्यासाठी ३९५० रुपये मोजावे लागणार आहेत. मासिक पाससाठी या वाहनांना ७९ हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.