राज्यात कुठे उष्णतेची लाट, तर कुठे पाऊस! हवामान खात्याने दिला इशारा
![In Maharashtra, there is a heat wave and there is rain](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/weather-update-780x470.jpg)
पुणे : राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत आहे. अशातच हवामान खात्याने पुढील तीन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तसेच काही ठिकाणी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचाही अंदाज वर्तवला आहे.
पुणे शहराच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पुढील चार ते पाच दिवस शहरात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती जाणवेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्यांनी दिली. या सोबतच जूनमध्ये शहरात बहुधा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा – राज्यातील १० वीचा यंदाचा निकाल ९३.८३ टक्के, कोकण विभाग राज्यात पुन्हा अव्वल
पुण्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले आहे. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी बाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान, गरज नसल्यास दुपारी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. गुरुवारी पुण्याचे तापमान हे ४१ अंश सेल्सिअस होते. पुणे शहरात देखील अनेक भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. कोरेगाव पार्क, तळेगाव ढमढेरे, वडगाव शेरी, मार्गरपट्टा या भागात ४० ते ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार-पाच दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका
हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना मान्सूनसाठी अजून ८ ते १० दिवस वाट पहावी लागणार आहे. अंदमानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून वर सरकला आहे. मान्सून ४ जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली. तसेच यंदा सरासरी ९६ टक्के इतका पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.