हिंगोलीत भीषण अपघात, भरधाव कार डिव्हायडरवर आदळली, पाच जण जखमी
![हिंगोलीत भीषण अपघात, भरधाव कार डिव्हायडरवर आदळली, पाच जण जखमी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/हिंगोलीत-भीषण-अपघात-भरधाव-कार-डिव्हायडरवर-आदळली-पाच-जण-जखमी.jpg)
हिंगोली: सेनगाव ते रिसोड मार्गावर पानकनेरगाव फाट्याजवळ भरधाव कार डिव्हायडरवर आदळून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना रविवारी (२२ मे) मध्यरात्री घडली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील पाच जण त्यांच्या कारने विदर्भातील रिसोड येथे गेले होते. रविवारी रात्रीच्या सुमारास तेथून काम आटोपून हे पाचही जण परत नांदेडकडे निघाले होते. त्यांची कार रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास रिसोड ते सेनगाव मार्गावर पानकनेरगाव फाट्याजवळ आली असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारची डिव्हायडरला धडक बसली. या अपघातात कारमधील कुणाल थोरात, सोमेश्वर नागेश्वर, स्वप्नील चौदंते, अर्जून विटकरे आणि अन्य एक जण जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद झालेली नाही. त्याचबरोबर सोमवारी सकाळी सेनगावपासून काही अंतरावर संत नामदेव बाजार समितीच्या समोर एक कार उलटून कारमधील काही प्रवाशी गंभीर झाले आहेत. ही घटना सेनगाव ते येलदरी रोडवर घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.