“क्या हार में, क्या जीत में, किंचित…”; पूनम महाजन यांनी शेअर केला प्रमोद महाजन यांचा जुना व्हिडीओ!
!["In defeat, in victory, a little…"; Poonam Mahajan shared Pramod Mahajan's old video!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/1111.jpg)
मुंबई |
भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची आज जयंती असून त्यानिमित्ताने भाजपासोबतच इतरही पक्षातील नेत्यांकडून अभिवादन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार आणि प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये पूनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रमोद महाजन एक कविता ऐकवत असून त्यातून त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी स्पष्ट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे.
पूनम महाजन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रमोद महाजन अटल बिहारी वाजपेयींच्या एका कवितेतल्या काही ओळी ऐकवत आहेत. “क्या हार में, क्या जीत में…किंचित नहीं भयभीत मैं, संघर्ष पथपर जो भी मिला, ये भी सही, वो भी सही”, अशी वाक्य प्रमोद महाजन या व्हिडीओमध्ये बोलून दाखवत आहेत. पुढे व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “मला वाटतं की या कवितेचा जो भावार्थ आहे त्याच्यासोबत मी चालत राहातो. हार-जीतच्या दृष्टीकोनातून मी स्वत: माझ्या आयुष्याकडे बघत नाही. समोरचा तसं बघत असेल, तर तो त्याचा दृष्टीकोन आहे, मी त्याला थांबवू शकत नाही”.