महत्त्वाची बातमी! …म्हणून ३१ मे रोजी देशभरात रेल्वे धावणार नाही?, वाचा सविस्तर
![महत्त्वाची बातमी! ...म्हणून ३१ मे रोजी देशभरात रेल्वे धावणार नाही?, वाचा सविस्तर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/महत्त्वाची-बातमी-म्हणून-३१-मे-रोजी-देशभरात-रेल्वे-धावणार-नाही.jpg)
नवी दिल्ली : सरकारने (Railway Ministry) वेळीच उपाययोजना न केल्यास या महिन्याच्या ३१ तारखेला देशभरात रेल्वेची चाकं थांबण्याची शक्यता आहे. कारण भारतीय रेल्वेचे (Indian Railways) सर्व स्टेशन मास्टर्स सामूहिक रजेवर जाणार असल्याची माहिती आहे. रेल्वेच्या उदासीनतेमुळे देशभरातील सुमारे ३५,००० स्टेशन मास्टर्सनी रेल्वे बोर्डाला नोटीस बजावली आहे. यामध्ये ३१ मे रोजी संपावर जाण्यार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- स्टेशन मास्तर सामूहिक रजेवर का जात आहेत?
ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे (All India Station Masters Association)अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या स्टेशन मास्टर्सकडून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सध्या देशभरात सहा हजारांहून अधिक स्टेशन मास्टर्सची कमतरता आहे. इतकंच नाहीतर रेल्वे प्रशासन या पदावर भरती करत नाही. त्यामुळे देशातील अर्ध्याहून अधिक स्थानकांवर सध्या फक्त दोनच स्टेशन मास्तरांची नियुक्ती आहे.
स्टेशन मास्तरांची शिफ्ट आठ तासांची असली तरी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना दररोज १२ तासांच्या पाळ्या कराव्या लागतात. ज्या दिवशी स्टेशन मास्तरला सुट्टी असते, त्या दिवशी कर्मचाऱ्याला दुसऱ्या स्थानकावरून बोलावावं लागतं. अशा परिस्थितीत कोणत्याही कर्मचार्यांची प्रकृती बिघडली किंवा त्यांच्या घरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर ओरड होते. यासंबंधी अनेक वेळा तक्रारी करूनही तोडगा निघत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. जर असं झालं तर यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागेल. स्टेशन मास्तर संघटनेचा हा निर्णय अचानक घेतलेला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
- काय आहे मागण्या?
१) रेल्वेतील सर्व रिक्त पदे जलद भरणे.
२) कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्ता बहाल करणे.
३) स्टेशन मास्टर्सच्या संवर्गात १६.०२.२०१८ ऐवजी ०१.०१.२०१६ पासून MACP चा लाभ प्रदान करणे.
४) सुधारित पदनामांसह संवर्गांची पुनर्रचना.
५) रेल्वे सुरक्षित आणि वेळेवर धावण्यासाठी स्टेशन मास्टर्सना त्यांच्या योगदानासाठी सुरक्षा आणि तणाव भत्ता प्रदान करणे.
६) रेल्वेचे खाजगीकरण आणि कॉर्पोरेटायझेशन थांबवा.
७) नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करणे.