“ताकदच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू”; संभाजीराजेंचा सूचक इशारा!
![Whatever happens, the Maratha community will not remain silent without giving justice, Sambhaji Raje left Raigad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Chhatrapati-Sambhajiraje16-1.jpg)
कोल्हापूर |
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर, दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे. ते राज्यभर दौरा करून अनेक नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या पाठोपाठच अनेक संघटना देखील आता आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपा नेते नारायण राणे यांनी या संभाजीराजेंवर या मुद्यावरून टिप्पणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी ट्विटद्वारे इशारा दिल्याचे दिसत आहे. “छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल, तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.” असं संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 4, 2021
तर, “छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे कोकणात आले? कधी कुठे आले, मला भेटले नाही. मला समजलं असतं तर मी स्वागत केलं असतं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. आता टर्म संपत आल्यावर राजेंनी राजीनामा देऊ नये. राजे फिरताहेत पण रयत दिसत नाही आजूबाजूला. राजांना रयत भेटायला येते हे का फिरतायत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना काल केली होती. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा, केंद्राच्या आरक्षण सूचित समाजाचा समावेश करण्यासाठी राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना प्रस्ताव पाठवावा तसेच समाजाच्या विविध मागण्यांबाबत ६ जूनपूर्वी तोडगा काढावा. अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी करोनाची पर्वा न करता राज्यभरात आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली जाईल आणि त्याची सुरुवात रायगडावरून केली जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. या समाजासाठी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.