‘एकाही गद्दारला मी रोजगार देणार नाही’; उद्धव ठाकरे यांचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/PUNE-2-780x470.jpg)
मुंबई : ‘‘राज्य सरकारमध्ये बसलेले गद्दार एका महिन्यात बेरोजगार होणार असून आपल्याकडे रोजगार मागायला येतील. पण, एकाही गद्दारला मी रोजगार देणार नाही,’’ असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्यांसाठी दरवाजे बंदच असतील असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले. प्रकल्पांच्या नावाखाली गद्दारांचे सरकार माझ्या महाराष्ट्राला लुटत आहे. मात्र एक महिन्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्याचा हिशेब मांडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा – ‘मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं’; ठाकरे गटाच्या आमदाराचा मोठा दावा
आमदार अनिल परब यांच्या विधानपरिषद निवडणूक काळातील वचनपूर्तीनिमित्त ठाकरे यांच्या शिवसेनेचा महानोकरी मेळावा पार पडला. ते म्हणाले की, आपले सरकार पाडल्यानंतर एकही नवा उद्योग राज्यात सुरू झाला नाही. आपण जे काही मोठे प्रकल्प आणले ते गुंतवणूकदारसुद्धा राज्यातील अस्थिर वातावरणात यायला तयार नाहीत.
‘‘आज एका बाजूला पंतप्रधान त्यांच्या कंत्राटदार मित्राचे खिसे भरायला येत आहेत. आपले हिंदुत्व लोकांच्या घरची चूल पेटविणारे असून भाजपचे हिंदुत्व हे घर पेटविणारे आहे. म्हणूनच त्यांना शिवसेना संपवायची आहे,’’ असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.