हे सरकार पडेल असे मला वाटत नाही- राज ठाकरे
![I don't think this government will fall - Raj Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/raj-thackeray1-1.jpg)
औरंगाबाद – सध्या राज्यात लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून राज्यातील विकास खुंटलेला आहे. महत्त्वाच्या निर्णयांकडे महाविकास आघाडीच्या सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. मात्र कितीही घोटाळे समोर आले तरी, ठाकरे सरकार पडेल असे मला वाटत नसल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज व्यक्त केले. आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र या तिन्ही पक्षात समन्वय नसल्याचे दिसत आहे. केवळ सत्तेसाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्ष त्यांचे घोटाळे बाहेर काढत आहे. त्यांच्यावर दबाव निर्माण करुन सरकार पाडू असे विरोधी पक्षाला वाटत असेल. मात्र सत्तेतील तिन्ही पक्ष सहजासहजी हार मानणार नाही. ठाकरे सरकार (Thackeray Government) पडणार नाही, असे मला वाटते. आघाडी सरकारकडून कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेतला जात नाही. आघाडी सरकारबाबत लोकांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही. त्यांच्यात जर संताप असेल तर मतपत्रिकेच्या माध्यमातून तो व्यक्त केला जाऊ शकतो. मात्र जनता आपला संताप व्यक्त करत नाही. लोक आपले मत फुकट घालवतात,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.