“मी मोठ्या जमीनदाराचा मुलगा असून, माझ्याकडे वडिलोपार्जित… ; एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना लगावला टोला

जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय युद्ध चांगलेच पेटले असून, परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस सुरू आहे. दोघांमधील जुना वाद आता अधिक तीव्र होत चालला आहे.
एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर केलेल्या ताज्या टीकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. “मी मोठ्या जमीनदाराचा मुलगा असून, माझ्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेती आहे. मात्र, ज्यांचे वडील साधे शिक्षक होते, ते इतके मोठे कसे झाले?” असा सवाल करत खडसेंनी महाजनांना थेट डिवचले.
यावर महाजनांनीही तितक्याच जोरदार शब्दांत प्रत्युत्तर दिले. “संपूर्ण राज्याला माहिती आहे की कोण तुरुंगात गेले आणि कोण चोरी करत आहे. दिल्लीला जाऊन कोणी माफी मागून लोटांगण घातले, तेही लोक विसरलेले नाहीत,” असे म्हणत त्यांनी खडसेंवर पलटवार केला.
हेही वाचा – पाझर तलावात पोहताना दमछाक होऊन ४ शाळकरी मुलांचा मृत्यू
महाजनांच्या वक्तव्यावर उत्तर देताना खडसे पुन्हा आक्रमक झाले. “मला कुणाला लोटांगण घालण्याची गरज नाही. आजही माझे तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. माझ्या घरात केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे लोटांगण घालायची वेळ येत नाही,” असे म्हणत त्यांनी महाजनांवर टोला लगावला.
खडसेंनी पुढे एक मोठा इशाराही दिला. “गिरीश महाजन यांनी कमावलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची यादी मी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे,” असे सूचित करत त्यांनी गंभीर आरोप केला. “मी कधीही मुरूम चोरीसारख्या कोणत्याही गैरप्रकारात सामील झालो नाही. महाजन यांचीच प्रवृत्ती खोटे गुन्हे दाखल करण्याची आहे. माझ्यावर ईडीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. हे सगळे माझे राजकीय करिअर संपवण्यासाठी रचले गेले होते. सगळ्यांना याची माहिती आहे,” असे म्हणत खडसेंनी महाजनांवर आरोपांची मालिका सुरूच ठेवली.
“मी महामार्गाच्या मोबदल्यात कुठलीही जमीन घेतलेली नाही. माझ्याकडे असलेल्या जमिनी या वडिलोपार्जित आहेत,” असा पुनरुच्चारही खडसे यांनी केला. या वादातून आगामी काळात राज्याच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.