HSC, 12th Result 2019: यंदाही मुलींनीच मारली बाजी, राज्याचा निकाल 85.88 टक्के
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (दि. 28) जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ८५. ८८ टक्के इतका लागला आहे. यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज दुपारी १ पासून ऑनलाइन निकाल उपलब्ध राहणार आहे.
यावर्षी राज्यभरातून बारावीच्या परीक्षेत १४ लाख २३ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती. यात मुलींची संख्या ६ लाख ३० हजार २५४ तर मुलांची संख्या ७ लाख ९१ हजार ६८२ इतकी होती. यातील १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा निकाल ८५. ८८ टक्के इतका लागला आहे.
गुण पडताळणीसाठी २९ मे ते ७ जून आणि छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.