अमरावतीत हॉटेलला आग, एकाचा मृत्यू
![Hotel fire in Amravati, one killed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/pune-fire.png)
अमरावती |
राजापेठ पोलीस ठाण्यासमोर असलेल्या हॉटेल इंपिरियाला मंगळवारी पहाटे ३ वाजता भीषण आग लागली. यात धुराने गुदमरून एकाचा मृत्यू झाला. हॉटेलचे वीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दिलीप चंद्रकांत ठक्कर (५५) रा. नागपूर असे मृताचे नाव आहे. केबल नेटवर्कच्या कामासाठी ते अमरावतीला आले होते. इंपिरिया हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. दरम्यान, मंगळवारी पहाटे हॉटेलला अचानक आग लागली. सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इंपिरिया या हॉटेलमध्ये १३ खोल्या उपलब्ध आहेत. मंगळवारी पहाटे आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये पाच जण मुक्कामाला होते. खोली क्र मांक २०१ च्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक स्वीच बोर्डमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
याच एका बोर्डमधून इतर सर्व खोल्यांमध्ये वीजपुरवठा होतो. आग लागताच संपूर्ण हॉटेलमध्ये धूर पसरला. व्हेंटिलेशनची योग्य व्यवस्था नसल्याने खोल्यांमध्ये धूर दाटला. २०५ क्र मांकाच्या खोलीत दिलीप ठक्कर होते. जीव गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. आग लागल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचारी धावले, अग्निशमन विभागाचे पथकही पोहचले. अन्य पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सर्वाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मृत दिलीप ठक्कर हे जीटीपीएल हॅथवे या कं पनीत व्यवस्थापक म्हणून कामाला होते. ते कं पनीच्या कामासाठीच अमरावतीत आले होते, अशी माहिती मिळाली आहे. हॉटेलमध्ये पुरेशी व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही. शिवाय ‘फायर ऑडिट’ देखील करण्यात आलेले नव्हते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. समोरच राजापेठ पोलीस ठाणे असल्याने आगीची माहिती मिळताच सर्वप्रथम पोलीस कर्मचारी मदतीसाठी धावले. त्यांनी हॉटलमधील पर्यटकांना बाहेर काढले. पण, दुर्दैवाने दिलीप ठक्कर यांचा मृत्यू झाला.