महिलांसाठी खुली कारागृहे उभारणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती
![Home Minister Dilip Walse Patil informed that open prisons will be set up for women](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/dilip-walse-patil-.jpg)
पुणे – कारागृह विभागाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज शनिवारी येरवडा कारागृहाला भेट दिली. त्यावेळी अधिकाऱ्यांना सूचना देताना त्यांनी महिलांसाठी खुली कारागृहे उभारणार असल्याचे सांगितले. तसेच कारागृह विभागाचे सध्या मुख्यालय जुन्या मध्यवती इमारतीमध्ये आहे. तेथून हलवून येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणार्या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मुंबई येथे बहुमजली कारागृह उभारणे, महिला कैद्यांसाठी खुले कारागृह निर्माण करणे तसेच बंद्यांना न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रायलसाठी हजर करण्यास सीआरपीमध्ये दुरुस्ती करुन जास्तीत जास्त प्रमाणात व्हीसीचा वापर करुन कैद्यांचा वेळ वाचेल. न्याय प्रक्रिया जलद होईल, यासाठी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी आदेश दिले. यावेळी अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा कारागृह अधीक्षक यु. टी. पवार आदी उपस्थित होते.