Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

महापुराचा फटका! मर्यादित उपस्थितीत आज माउलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पिंपरी : इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीतील परिस्थिती गंभीर बनली असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आज (८ जुलै) अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पडणार आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा – जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन

महापुरामुळे इंद्रायणी पुलावरील कठडे आणि वीजखांब वाहून गेले आहेत. तसेच पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेली दर्शनबारी, सुमारे ४०० मोबाइल शौचालये आणि इतर सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. नगरपरिषदेचा पाणीपुरवठा करणारा पंपही पाण्याखाली गेल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

वीजपुरवठा खंडित होणे, तंबू परिसरात चिखल साचणे आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे लाखो वारकऱ्यांची व्यवस्था करणे अशक्य असल्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाविकांनी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

संजीवन समाधी मंदिरातून दुपारी ३ वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे. मानाच्या ५६ दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ १० वारकऱ्यांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार असून, दिंडीप्रमुख, मानकरी आणि सेवेकरी अशा मिळून १,६६० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

दरम्यान, आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद असून, दोन पुलांवरील पाणी ओसरले असले तरी उर्वरित दोन पूल अद्याप पाण्याखाली आहेत. पुलांचे कठडे तुटल्याने आणि जलपर्णी अडकल्यामुळे पूल कमकुवत झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुलांचे स्थापत्यविषयक परीक्षण झाल्यानंतरच ते वाहतुकीसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button