‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे- एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा शुभारंभ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी नाळ जोडून, त्याच्या श्रद्धेला सुरक्षिततेची आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ योजना सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ही योजना सुरू केली आहे, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ही योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्याय यांचा सुरेख संगम आहे.ही योजना ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित असून, सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देण्याचा तिचा मुख्य उद्देश आहे. असे प्रताप सरनाईक म्हणाले.
राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सर्व सवलती या योजनेत जशाच्या तशा लागू राहणार आहेत. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक आगार कार्यक्षेत्रातून ४० प्रवाशांचा गट तयार करून, त्यांच्या सामाजिक सवलतीच्या तिकीट दरात सहली आयोजित केल्या जाणार आहेत. या सहलींसाठी एसटीच्या नव्या, सुरक्षित आणि आरामदायी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
हेही वाचा –एसटी बसमधून बनावट दिव्यांग ओळखपत्रावर प्रवास… थेट गुन्हा दाखल होणार !
२३ जानेवारी २०२६ पासून ही योजना राज्यातील २५१ आगारांत एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान ५ बसेस या योजनेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने, राज्यभरात एका दिवशी सुमारे १,००० ते १,२५० धार्मिक व पर्यटन विशेष बसगाड्या धावणार आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला एक नवे बळ मिळणार आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, पंढरपूर–अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर–पन्हाळा–जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी अशा विविध श्रद्धास्थळांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक वैभवाचा अनुभव घेण्याची ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
‘स्वस्त आणि सुरक्षित पर्यटन’ ही केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्षात उतरवणारी ही योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वसामान्यांवरील प्रेमाची आणि विचारांचीच पुढची पायरी आहे. त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सुरू होत असलेली ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ योजना राज्यातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा, सुरक्षिततेचा आणि समाधानाचा प्रवास ठरणार आहे. अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत.




