एकट्या महाराष्ट्रात ५२.४६% परकीय गुंतवणूक; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Devendra Fadnavis | महाराष्ट्रात एप्रिल ते जून २०२४ दरम्यान ७०,७९५ कोटी रुपयांची परकी गुंतवणूक आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, अतिशय आनंदाची बातमी! देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२,४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra FDI) झाली आहे. मागील दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १ वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची पकड मजबूत, विधानसभेत महायुती जिंकणार!
वेगवेगळी राज्ये व त्यांना मिळालेली परकीय गुंतवणूक
महाराष्ट्र – ७०,७९५ कोटी रुपये
कर्नाटक – १९०५९ कोटी रुपये
दिल्ली – १०,७८८ कोटी रुपये
तेलंगणा – ९०२४ कोटी रुपये
गुजरात – ८५०८ कोटी रुपये
तामिळनाडू – ८,३२५ कोटी रुपये
हरयाणा – ५८१८ कोटी रुपये
उत्तरप्रदेश – ३७० कोटी रुपये
राजस्थान – ३११ कोटी रुपये
या सर्व राज्यांमधील परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra FDI) आली आहे. थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १,३४,९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७०,७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यात १,१८,४२२ कोटी, (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) २०२३-२४ मध्ये १,२५,१०१ कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती.
राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३,६२,१६१कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही ५ वर्षांचे काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता सव्वा दोन वर्षांत ३,१४,३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.