#HelloMumbai: मुंबईकरांच्या भेटीला येतोय पाऊस, वाचा कुठे व कधी बरसणार?
![Mumbai Rains : वीकेंड मुंबईकरांच्या भेटीला येतोय पाऊस, वाचा कुठे आणि कधी बरसणार?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Mumbai-Rains-वीकेंड-मुंबईकरांच्या-भेटीला-येतोय-पाऊस-वाचा-कुठे.jpg)
मुंबई : मुंबईतील अनेक भागात गुरुवारी सकाळी पावसाने हजेरी लावली आणि कुर्ल्यातील सखल भागातही पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यात दिवसभर पावसाने हजेरी लावली. IMD ने रविवारपासून मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दोन दिवसांच्या मान्सूनपूर्व हालचालीनंतर ११ जून रोजी मान्सूने मुंबईत हजेरी लावली. पण यानंतर मुंबई आणि लगतच्या भागात पाऊसाने दांडी मारली. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता २४ तासांत, IMD च्या कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळांमध्ये १८ मिमी आणि ११.७ मिमी पावसाची नोंद झाली.
IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय मान्सूनच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, १८ जूनपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे हवामान खात्याने, मच्छिमारांसाठी देखील इशारा जारी केला आहे आणि त्यांना २० जून रोजी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. “वाऱ्याचा वेग ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमीपर्यंत जाऊ शकतो. वादळी हवामान उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि त्याच्या जवळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे २० जूनला मच्छिमारांना उपरोक्त कालावधीत उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर आणि त्याच्या जवळ जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सखल भागात आणि शहरी भागात पूर येणे, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत होणे, रस्ते, रेल्वे, हवाई आणि नौका वाहतुकीला अडथळा आणि अधूनमधून ४०-५० पर्यंत वेग असलेले सोसाट्याचे वारे. तर किनार्याजवळ ताशी ६० किमी वेगाने वारे वाहत आहे, परिणामी असुरक्षित/तात्पुरत्या संरचनेचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.