विदर्भात उष्णतेचा कहर तर कोकणात पावसाच्या सरींची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
![Heat wave in Vidarbha and possibility of rain showers in Konkan; Meteorological Department warning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/heat-and-rain.jpg)
मुंबई | राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आणखी 2 दिवस कायम राहणार आहे. निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसांच्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. मुंबई परिसरासह कोकणात तापमान अजूनही सरासरीच्या पुढेच आहे. दक्षिण कोकणात काही भागात आज आणि उद्या पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचे चटके आणखी वाढणार आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत ते चक्रीवादळात परिवर्तीत होईल. त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट येणार आहे. गुजरात, नैऋत्य राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, खूप जास्त तापमान नोंद होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाची झळ विदर्भाला सर्वाधिक बसतेय.
नांदेड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली. गेल्या 2 दिवसात कमाल तापमानात मोठी वाढ झालीय. नांदेडमध्ये कमाल तापमान 40 डिग्री सेल्सियस नोंदवल्या गेले. या वर्षीचे हे सर्वाधिक तापमान आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकाकड़ून रुमाल आणि टोपीचा वापर केला जातोय. तर शीतपेयाकडे देखील नागरिकांचा कल वाढला आहे.