राणा दाम्पत्याचा जेलमधील अनुभव ऐकला, इंग्रजांच्या जेलची आठवण झाली : किरीट सोमय्या

मुंबई |
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला काल न्यायालयाने जामीन दिला. आज दोघेही जेलबाहेर आले. नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेलमधून बाहेर येताच रुग्णालयात जाऊन रवी राणांनी पत्नी नवनीत यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या देखील होते. राणा दाम्पत्यांनी जेलमधील अनुभव ऐकला. त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर इंग्रजांच्या जेलची आठवण झाली, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
“राणा दाम्पत्याचे जेलमधील अनुभव ऐकून ते इंग्रजांच्या जेलमध्ये होते की काय, असा प्रश्न पडतो. मला तर इंग्रजांच्या जेलची आठवण झाली. त्या खासदार आहेत, ते आमदार आहेत हे बाजूला ठेवा. पण उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारने हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर ज्या पद्धतीने अन्याय केला, त्यांना राम आणि हनुमान कधीही माफ करणार नाही तसेच महाराष्ट्रातील जनताही माफ करणार नाही”, असं सोमय्या म्हणाले. “नवनीत राणा यांना जेलमधून थेट रुग्णालयात यावं लागलं, याचं वाईट वाटतंय. मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती रुग्णालयात आलोय. ठाकरेंच्या माफिया सरकारचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. अशा प्रकारचे दिवस महाराष्ट्रात आलेत, याची आम्हाला लाज वाटतीये”, असं म्हणत सोमय्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं.
- रवी राणांना पाहताच नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला
तब्बल १२ दिवसांनी राणा पती पत्नीची भेट झाली. यावेळी रवी राणांना पाहताच नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना जवळ घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. यावेळी त्यांच्याबरोबर किरीट सोमय्या देखील उपस्थित होते.
जामीन जरी मिळालेला असला तरी रवी राणा यांना तुरुंगातून सुटण्यासाठी उशीर झाला. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते तळोजा तुरुंगातून बाहेर आले. तिथून ते तडक लीलावती रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी नवनीत राणा यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरकडूनही त्यांनी माहितीही घेतली. तत्पूर्वी रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या धायमोकलून रडायला लागल्या. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना जवळ घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. तुझ्याबरोबरच आहे, कुठेही जात नाही, असा धीरही दिला.
दरम्यान, राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी, त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यांना संबंधित प्रकरणावर माध्यमांशी बोलता येणार नाही. त्याचबरोबर साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास अथवा त्यांच्यावर दबाव टाकण्यास मनाई करण्यात आली आहे.