आरोग्य विभागाच्या परीक्षेची तारीख जाहीर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
![Rajesh Tope indicated that restrictions on vaccination are likely to be relaxed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Rajesh-Tope-1-1.jpg)
मुंबई – मागील आठवड्यात होणारी आरोग्य विभागाची परीक्षा पुढील महिन्यात होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने पदभरती स्थगित केल्याने राज्यात परीक्षेचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा यानिमित्ताने समोर आला. मात्र स्थगित झालेली परीक्षा पुढील महिन्यात होईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संगितले. ही परीक्षा १५-१६ ऑक्टोबर किंवा २२-२३ ऑक्टोबरला होईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आयत्या वेळी परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांचा वेळ आणि पैशांचेही नुकसान झाले होते. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत लवकरच नवी तारीख जाहीर करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी सध्या दोन वेगवेगळ्या तारखांच्या शक्यता व्यक्त केल्या आहेत. जर रेल्वेची परीक्षा पुढे ढकलणे शक्य झाले नाही, तर मात्र २२-२३ तारखेला परीक्षा घेतली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा २५आणि २६ सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली. ही घोषणा होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरातून बाहेर पडले होते, काही विद्यार्थी पोहोचले होते तर काहीजण प्रवासात होते. आयत्या वेळी परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचं आणि पैशांचंही नुकसान झालं होतं. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत लवकरच नवी तारीख जाहीर करण्याचं आश्वासन सरकारने दिले होते. दरम्यान, ही परीक्षा घेण्याचे काम सरकारने न्यासा कंपनीला दिले आहे. मात्र या कंपनीचा पूर्वइतिहास वादग्रस्त आहे.
पंजाबमधील ढिसाळ कामगिरीबद्दल या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढले. यापूर्वी अनेक घोळ घातलेल्या या कंपनीला महाराष्ट्र सरकारने आरोग्य विभागाच्या परीक्षांचे काम दिले होते. शिवाय त्यातील गोंधळाबद्दल यापूर्वी कुठलीही कारवाई केली नव्हती. त्याचा नाहक ताप वारंवार विद्यार्थ्यांना सहन करावा लागला होता.