पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयपासून पुन्हा एकदा संपर्क तुटला
गडचिरोली : मागील ४८ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयपासून पुन्हा एकदा संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात देखील रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता आणि पर्लकोटा ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडशी संपर्क तुटला आहे. दुसरीकडे मेडीगड्डा धरणाचे ७० दरवाजे खुले करण्यात आल्याने सिरोंचा तालुक्यातील नदीकाठावरील गावात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. असाच पाऊस कोसळत राहिल्यास या भागातील काही गावांतील नागरिकांचे स्थलांतर करावे लागेल.





