महाराष्ट्रात सरकार स्थापन होत असताना मोठ्या नेत्यांचेही फोन टॅप केले; राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप
![He also tapped the phones of big leaders while the government was being formed in Maharashtra; Sensational allegations of the NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Mahavikas-Aghadi-2.jpg)
मुंबई |
भाजपा नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यावर पांघरुण घातल्याचा आरोप केला आहे. फडणवीसांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल सादर केला. दरम्यान फडणवीसांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं असून गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात सरकार तयार करत असताना रश्मी शुक्ला सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“फडणवीसांना सादर केलेला फोन टॅपिंगचा अहवाल माझ्याकडे आहे. फडणवीस बदल्यांसाठी पैसे घेण्यात आले, ते या राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहखातं त्यांनी सांभाळलं आहे. कोणताही मंत्री थेट बदली करत नाही, त्यासाठी एक कमिटी आहे. कोणताही मंत्री आपल्या अधिकारात या बदल्या करु शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांसाठीदेखील समिती आहे. त्यामुळे फडणवीस दिशाभूल करत आहेत,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
“फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि पोलीस बदलीची नियमावली माहिती असताना खोटा रिपोर्ट देण्यात आला, त्याच्या आधारे सरकारला बदनाम करण्याचा कट कारस्थान करत आहेत. रश्मी शुक्लांच्या बाबतीत सांगत आहेत की, त्यांनी परवानगी घेऊन फोन टॅपिंग केलं. त्यांनी कोणतीही परवानगी न घेता ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या. हा गुन्हा आहे. जेव्हा महाराष्ट्रात सरकार निर्माण करण्याचं संकट होतं तेव्हा सगळ्यांचे फोन टॅप करण्याचं काम रश्मी शुक्ला करत होत्या, कुठेतरी भाजपाच्या एजंट या नात्याने काम करत असताना त्यांना बेकायदेशीरपणे फोन इंटरसेप्ट करण्याची त्यांना सवय लागली होती. ज्या अहवालाचा उल्लेख फडणवीस करत आहेत त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता टॅपिंग सुरु होतं. तसंच उल्लेख झालेल्या ८० टक्के बदल्या झालेल्या नाहीत,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
“फडणवीस आपण रिपोर्ट घेऊन केंद्रीय गृह सचिवांकडे जातो असं सांगत आहेत, याचा अर्थ बदल्या झालेल्या नाहीत. फडणवीस सत्ता गेल्यानंतर सरकार एक महिन्यात जाईल, दोन महिन्यात जाईल सांगत होतं. आमदार फुटतील असा दावा करत होते. सरकार पाडता आलं नाही म्हणून बदनाम करण्याचं काम भाजपा आणि फडणवीसांच्या माध्यमातून होत आहे. आज ते उघडे पडले असून दिलेली सर्व माहिती खोटी होती,” असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
वाचा- रस्ते सफाईच्या निविदेत सत्ताधारी व प्रशासनाचा संगनमताने मोठा झोल- संजोग वाघेरे, पाटील