हातात बेड्या, माना खाली, पोलिसांनी गुंडांची जिरवली! बेड्या घालून धिंड
![हातात बेड्या, माना खाली, पोलिसांनी गुंडांची जिरवली! बेड्या घालून धिंड](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/हातात-बेड्या-माना-खाली-पोलिसांनी-गुंडांची-जिरवली-बेड्या-घालून-धिंड.jpg)
कल्याण : सराईत गुन्हेगारांचा माज उतरवण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवल्याचं उदाहरण ठाणे जिल्ह्यातून समोर आलं आहे. कल्याण पोलिसांनी आधी या गुन्हेगारांना मोक्का लावला, त्यानंतर ज्या भागात त्यांनी दहशत पसरवली होती, त्याच भागात या गुन्हेगारांना बेड्या घालून फिरवले. पोलिसांच्या या कारवाईचं स्थानिक नागरिकांकडून खूप कौतुक होत आहे. कल्याणमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडांमध्ये आता पोलिसांचाच दरारा पाहायला मिळत आहे.
कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारांची दहशत
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गाव गुंडांनी खूपच दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री दारु पिऊन धिंगाणा घालणे, वाहनांची तोडफोड करणे, मारहाण करणे अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी बरेच प्रयत्न केले होते.
12 गुंडांच्या विरोधात मोक्का
जॉईंट सीपी दत्तात्रय कराळे, डीसीपी सचिन गुंजाळ यांनी कल्याण डोंबिवलीत गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाई सुरु केली. पोलिसांनी आधी एमपीडीए अंतर्गत कारवाई करत अनेक गुंडांना तुरुंगात पाठवले. त्यापेक्षा जास्त सराईत असलेल्या 12 गुंडांच्या विरोधात मोक्का लावण्यात आला.
बेड्या घालून अक्षरशः गल्ली गल्लीत फिरवले
कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या आदेशानंतर कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बशीर शेख, पीआय (क्राईम) सुनील गवळी, हरिदास बोचरे, मंजुनाथ डोके, अंकुश श्रीवास्तव या पोलिस कर्मचाऱ्यांनी खडेगोळवली भागात मोक्का लावण्यात आलेल्या काही आरोपांना बेड्या घालून अक्षरशः गल्ली गल्लीत फिरवले.
हातात बेड्या, माना खाली आणि मागे पोलिस. ज्या भागात या भाई लोकांची दहशत होती. त्या भागात त्यांना फिरवून पोलिसांनी त्यांची चांगलीच जिरवली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. स्वत:ला भाई, दादा समजणारे गुन्हेगार माना खाली घालून पोलिसांच्या घेरावात फिरत असतानाचे दृश्य शहराच्या विविध भागात सध्या दिसत आहे. नागरिकांमध्ये पोलिसांच्या या कारवाईमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. पोलिसांच्या या फंड्यामुळे गावगुंडांवर खरंच वचक बसणार का? हे पाहण महत्त्वाचं आहे.