देहूतील कार्यक्रमात पालकमंत्री अजित पवारांना भाषणापासून डावलले
- देहू संस्थानवर राष्ट्रवादीचा नाराजीचा सूर
पुणे : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात नितीन महाराज मोरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली. मात्र पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनाच भाषणापासून डावलण्यात आले. कार्यक्रमादरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे हातवारे करून बोलण्याबाबत इशारा केला. मात्र तरीही संस्थानकडून उपमुख्यमंत्री पवारांना बोलू दिले नाही. या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने हजारोंच्या संख्येने वारकरी आणि नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात सुरुवातीला नितीन महाराज मोरे यांचे भाषण झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. नंतर पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांचे भाषण होणे अपेक्षित होते.
मात्र देहू संस्थांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाचारण करण्यात आले. या वेळी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे हात दाखवत त्यांना बोलण्याची संधी द्या, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी केला. मात्र तरीही पालकमंत्री अजित पवार यांना का बोलू दिले नाही, या बाबत स्पष्टता आली नाही. या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संस्थांनवर नाराजीचा सूर ओढत आहेत. देहू संस्थान कडून खुलासा केला जावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





