दादा, पुढाकार घ्या; एकदा बारी सुरू करा!; आमदार लांडगे यांना गाडा मालकांचे साकडे!
![Grandpa, take the initiative; Start the turn once !; MLA Landage handed over to car owners!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/md-1.jpg)
- बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी निवेदन
- हवेली तालुका बैलगाडा संघटनेची बैठक
पिंपरी । प्रतिनिधी
राज्यातील हजारो गाडा मालकांचा आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत. सुमारे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यतीवर सध्या बंदी आहे. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल यामाध्यमातून होते. एकप्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस’ ठरणाऱ्या बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी बैलगाडा मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केली.
महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात बैलगाडा शर्यती हवेली तालुक्याच्या पट्ट्यातील खेड, चाकण, आंबेगाव, जुन्नर याच भागात होतात. बैलगाडा हाच तिथल्या जनतेचा प्रमुख सांस्कृतिक उत्सव बनला आहे. येथील लोकांच्या मनात बैलगाडा शर्यतीचं वेड इतकं रुजलंय, की ही शर्यत त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. मात्र बैलाचा संरक्षित यादीत समावेश केल्यामुळे शर्यत सुरू करण्यासाठीची लढाई अजूनही सुरू आहे.या पार्श्वभूमीवर हवेली तालुका बैलगाडा संघटनेची बैठक आमदार महेश लांडगे आणि महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी हवेली तालुक्यातील बैलगाडा मालक आणि शौकीन मित्र यांच्या वतीने शर्यत पुन्हा सुरू कराव्यात अशी आग्रही मागणी करण्यात आली. शर्यत सुरू करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी शरद बोऱ्हाडे, कमलेश लाटे, माजी महापौर राहुल जाधव, सचिन सोनवणे, तुषार भालेकर, मनोज मोरे, बाबासाहेब तापकीर, प्रदिप टिंगरे, बबलू तापकीर, बाळासाहेब भोसले, दिनेश यादव, शिवाजी ताम्हाणे, निलेश जाधव, निलेश मोरे, प्रशांत मोरे, गोट्या फुले, कैलास मोरे, दत्तात्रय मोरे, नामदेव मोरे, राजेंद्र नेवाळे, किसन बालघरे, नरहरी बालघरे, अंकुश मळेकर, नरहरी बालघरे, विनायक मोरे, सचिन भाडाळे, संतोष साने, अजित गायकवाड, रवि जांभूळकर, विनायक साळुंखे, संभाजी आल्हाट, रोहीत काळोखे, अमोल नेवाळे, विजू गायकवाड, महेश मोरे आदी उपस्थित होते.
- केवळ शर्यत नाही; शेतकऱ्यांची अस्मिता…
राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. कोट्यावधी रुपयांची उलाढाल यामाध्यमातून होते. शर्यतीसाठी वापरलेल्या खिलार खोंडाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. बैलांच्या पौष्टिक खुराकासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. शर्यत बंद असल्यामुळे उलाढालीला ‘ब्रेक’ लागला आहे. बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष व आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.