“…हा सरकारचा सुनियोजित कट”, एसटी कर्मचारी संपाबाबत गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/gopichand-padalkar-on-st-workers-strike-in-maharashtra.jpeg)
मुंबई |
गेल्या तीन महिन्यांहून जास्त कालावधीपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने मध्यस्थी करून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि वेतन निश्चिती यासंदर्भात घोषणा करून संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही प्रमाणात पूर्ण करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यावर कर्मचाऱ्यांचं समाधान झालेलं नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असताना आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
संप मिटवण्यापेक्षा चिघळवण्यात सरकारला रस?
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर संप चिघळवण्यात जास्त रस असल्याचा आरोप केला आहे. “एसटी संप मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे, त्यात वाढ झाली पाहिजे असा सुनियोजित कट सरकार रचत आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा असं आवाहन करायचं. आणि तो कर्मचारी जेव्हा कामावर रुजू होतो, तेव्हा त्याच्या हातात चार्जशीट द्यायचं. ५० लाखांचं, एक कोटीचं नुकसान झालंय असं सांगून त्यांना नोटीस द्यायची असं सरकार करत आहे”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.