समृद्धी महामार्गावर अपघात मालिकेनंतर आता गोळीबाराची घटना
![Good news for Indian women! Vaccine against uterine cancer will be available in 100 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Golibar-768x470.png)
नागपूर । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत असताना आता गोळीबाराची घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी भागातील बोगद्याजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार करताना दिसत आहे. याचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्राची भाग्य रेषा म्हणून समृद्धी महामार्गाचे रविवारी उद्धाटन करण्यात आले, मात्र प्रवासापेक्षा हा महामार्ग अपघातांमुळे चर्चेत येत आहे. महामार्ग सुरु झाल्यापासून यावर रोज अपघाताच्या घटना घडत आहेत. यानंतर आता महामार्गावर एक तरुणाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात बंदुक घेत पाठमोरा उभा दिसतोय.
व्हिडीओत एक तरुणहातात बंदुक घेऊन उभा असून त्यांच्यामागे एक बोगदा दिसतोय. महामार्गावरील या बोगद्याजवळ एका स्कॉपिर्ओ गाडीसमोर उभा राहून याने हवेत गोळीबार केला असं या फोटोतून दाखवण्यात आलं आहे. मात्र हा फोटो कुणी सोशल मीडियावर टाकला तो खरा आहे की खोटा याबाबत पोलीस तपासणी करत आहेत. समृद्धी महामार्गावर अलीकडे बैल गाड्यांचा ताफा जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर दोन हरण, साप, माकडे जात असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच 24 तासांत पहिली अपघाताची घटना घडली. यात पहिल्या टोलनाक्यावर एका कारने दुसऱ्या कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, ज्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेला 24 तास होत नाही तोवर बुलढाण्यात दुसरी घटना घडली.