‘पांढऱ्या सोन्या’ला झळाळी; कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांचा भाव
![‘पांढऱ्या सोन्या’ला झळाळी; कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांचा भाव](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Cotton.jpg)
बीड |
कापसाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर कापसाला सोन्याचा भाव आला असून सध्या कापसाला प्रति क्विंटल दहा हजाराचा भाव मिळू लागला आहे. मोठय़ा प्रमाणावर मेहनत करून, वेळोवेळी औषध फवारणी, खुरपण करूनही उत्पादन वाढत नसल्याने शेतकऱ्यांनी कापसाऐवजी अन्य पिकांना प्राधान्य दिले. परिणामी उत्पादन घटताच चांगला भाव मिळाला. महिनाभरापूर्वी हाच भाव सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा होता. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाऐवजी सोयाबीन आणि तुरीच्या पेरणीवर भर दिल्याने कापसाचे क्षेत्र तब्बल एक लाख हेक्टरने घटले.
अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला होता. दुष्काळ, अतिवृष्टी आणि किडीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे दुर्लक्ष केले. धारुर येथील नर्मदा जीनिंग अँड प्रेसिंगने ९ हजार ९५० रुपये, तर आडस येथे स्थानिक पातळीवर ९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव कापसाला मिळाला. काही ठिकाणी मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसानुसार भाव ठरला जात असला तरी बहुतांश खरेदी केंद्रावर दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळू लागला आहे. खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था झालेल्या कापसाला यावर्षी ऐतिहासिक भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.