“बनावट स्टँप पेपर उपमुख्यमंत्र्यांकडे आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते”; मनसे नेत्याचा उपमुख्यमंत्र्याना टोला
![निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/ajit-pawar-1.jpg)
मुंबई |
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील असं सुरुवातीपासून सांगण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्टँपवर लिहून देऊ का असं म्हणत मुख्यमंत्री अधिवेशनाला येणारच असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात संपूर्ण अधिवेशन उद्धव ठाकरे अधिवेशनाला येऊ शकले नाही. यावर अधिवेशनाची सांगता झाल्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले.
“या अधिवेशनाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती राहिली. सुरुवातीला अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन खालच्या आणि वरच्या सभागृहाची पाहणी केली. त्यांचं अधिवेशनावर फार बारकाईने लक्ष होतं. त्यांनी त्याबाबत सूचना देखील केल्या होत्या. या काळात ज्या दोन कॅबिनेट झाल्या त्यालाही ते व्हीसीद्वारे हजर होते, असे अजित पवार म्हणाले. यावरून आता मनसेने अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री पदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला त्यासाठी शुभेच्छा असे म्हटले आहे. “महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील बनावट स्टॅम्प पेपर बहुधा उपमुख्यमंत्र्यांकडे आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते. असो मुख्यमंत्री पदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला त्यासाठी शुभेच्छा,” असे संदिप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रा मध्ये गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील बनावट स्टॅम्प पेपर बहुधा उपमुख्यमंत्रांकडे आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते. असो मुख्यमंत्री पदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला त्यासाठी शुभेच्छा.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 29, 2021
- काय म्हणाले अजित पवार ?
“मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला यावं अशी आमची सर्वांचीच इच्छा होती. मी पण सुरुवातीला चहापानाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत स्टँपवर लिहून देऊ का असा दावा केला होता. पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्यापद्धतीने मी म्हटलो होतो. पण मुख्यमंत्री आले नाहीत,” असं अजित पवार यांनी म्हटले. “शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते, पण करोनाचे रुग्ण वाढायला लागले म्हणून मी आणि बाळासाहेब यांनी त्यांना अधिवेशनात येऊ नका अस सांगितलं त्यांची तब्येत पूर्ण सुधारावी यासाठी आपण प्रार्थना करूया,” असंही अजित पवार म्हणाले.