EVM हटाव जनआंदोलन; 9 ऑगस्ट क्रांती दिनी राजू शेट्टी काढणार लॉंगमार्च
कोल्हापूर – लोकशाहीवादी देशाची ओळख कायम राखण्यासाठी आपले मत आपण दिलेल्या उमदेवाराला जाते की नाही याची माहिती मिळण्याचा संपूर्ण अधिकार मतदाराला आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशिनमुळे लोकशाहीवादी लोकांमध्ये संभ्रम आणि संशय निर्माण झाला आहे. हा संभ्रम आणि संशय दूर करण्यासाठी देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या पाहिजे. त्यासाठी ‘ईव्हीएम हटाव’ राष्ट्रीय आंदोलन हाती घेतले असून आंदोलनाचा भाग म्हणून ऑगस्ट क्रांतीदिनी आझाद मैदान ते चैत्यभूमीदरम्यान लाँगमार्च काढण्यात येणार आहे.
शाहू स्मारक भवन येथे ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जनआंदोलन यांच्यावतीने ‘ईव्हीएमचे सत्य’ विषयावर आयोजित चर्चासत्रात हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी होते.
यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, निवडणुका पारदर्शक वातावरणात होतात का हे पाहण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणुकीबाबत लोकांच्यामध्ये शंका असल्यास त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी आयोगाची असताना आयोगाचे सदस्यच भितीच्या वातावरणात वावरत आहेत. त्यामुळे लोकशाहीवादी देश असे संबोधणे चुकीचे ठरेल.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आयोग दक्ष होता, तर 370 मतदारसंघात झालेल्या मतांपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली कशी? त्यामुळेच निकालामध्ये हेराफेरी झाल्याचे समोर येते. तांत्रिक करामती करुन सत्तेवर येणाऱ्या शक्तींना जनताच वठणीवर आणू शकते. त्यासाठी जनआंदोलन उभा करण्याची आवश्यकता आहे.ईव्हीएम हटाव’ राष्ट्रीय आंदोलन हाती घेतले असून आंदोलनाचा भाग म्हणून ऑगस्ट क्रांतीदिनी आझाद मैदान ते चैत्यभूमीदरम्यान लाँगमार्च काढण्यात येणार आहे. अस शेट्टी यांनी स्पष्ट केलं.