अखेर मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागणार; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
![The state government does not have the power to fix fees for non-taxable diseases - the Supreme Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Supreme-Court.png)
मुंबई – गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय नेत्यांसाठी आणि पक्षांसाठी राजकारण बनुनच राहिला होता. परंतु मागच्या काही वर्षांपासून हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून समाजाचं मोठ्या प्रमाणात एकत्रीकरण झालं आणि सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल झाली आणि मराठा समाजातील लोकांचा हिरमोड झाला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 10:30 वाजता अंतिम सुनावणी होणार असून आज या मुद्द्याचा सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. 26 मार्चला झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येणार असल्याने संपूर्ण मराठा समाजासह महाराष्ट्राच्या नागरिकांचं याकडे लक्ष लागून आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात 15 मार्च 2021 ते 16 मार्च 2021 दरम्यान सुनावणी पार पडली. तसेच 102 वी घटनादुरुस्ती राज्यांचे अधिकार नाकारत नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं. या सर्व प्रकरणात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निकाल आरक्षणाच्या बाजूने लागेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
मराठा समाजाला एसईबीसी अंतर्गत आरक्षण दिलं गेलं. पण या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर, न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती देत 5 न्यायमूर्तींच्या समोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. यादरम्यान शैक्षणिक आणि नोकरी संदर्भात आरक्षण राज्य सरकारने दिलं होतं. पण न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणींचं यामध्ये नुकसान झालं. त्यामुळे समाजामध्ये आक्रोशही पाहायला मिळत होता. आज सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.