केंद्रानं ट्रेन सोडल्या तरी रिकाम्या पाठवणं तुमची जबाबदारी होती- चंद्रकांत पाटील
![केंद्रानं ट्रेन सोडल्या तरी रिकाम्या पाठवणं तुमची जबाबदारी होती- चंद्रकांत पाटील](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/chandrakant-patil.jpg)
पुणे |
देशभरात करोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.
दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने परप्रांतियांसाठी रेल्वे गाड्या सोडल्याचा पुरावा देत जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्राने रेल्वे सोडल्या तरी त्या रिकाम्या जातील ही तुमची जबाबदारी होती. लॉकडाउन झाला तरी लोकांना आम्ही तुमची काळजी करु हा आत्मविश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करायला हवा होता. ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या. पण लोकांना आत्मविश्वास देऊन त्या रिकाम्या जायला हव्या होत्या,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
- मोदी काय म्हणाले, ते लोकांना नीट समजले – चंद्रकांत पाटील
परप्रांतीयांना गावी पाठविण्यासाठी विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्याचा निर्णय केंद्राकडून होण्याआधी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी त्यांना फूस लावून रस्त्यावर आणले होते. केंद्राचा निर्णय झाल्यावर या मजूर व कामगारांचे हाल होऊ नयेत, समन्वय राहावा, यासाठी भाजपा नेत्यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधला होता. सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी काय म्हणाले, ते लोकांना नीट समजले आहे. राज्यांत नागरिकांची सेवा करण्याऐवजी कामगारांनी त्यांच्या गावी जावे, असा प्रयत्न झाला. राज्य सरकारने जबाबदारी झटकल्याने लोकांची परवड झाली. हा महाराष्ट्रद्वेषाचा विषय नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
- सर्वाधिक रेल्वेगाडय़ा गुजरातमधून – सुप्रिया सुळे
याआधी, करोनाच्या पहिल्या लाटेत श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे आभार मानले होते. रेल्वेगाडय़ांची व्यवस्था केली असून प्रवाशांची यादी देण्याची विनंती गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. श्रमिक रेल्वेगाडय़ा राज्यांनी नव्हे, केंद्राने सोडल्या होत्या. सर्वाधिक रेल्वेगाडय़ा गुजरातमधून सोडल्या गेल्या, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.
- काँग्रेसने देशात करोना पसरवला – पंतप्रधान मोदी
दरम्यान, ‘‘करोनाच्या पहिल्या लाटेत देश टाळेबंदीचे पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन करोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश हे नेते देत होते. तुम्ही (काँग्रेस) लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाचे वातावरण निर्माण केले. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तुम्ही देशभर करोना पसरवला’’, असा आरोप मोदींनी केला होता.