“३ नाही तर ३० पक्ष एकत्र आले तरी….” मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर वरुण सरदेसाईंची टीका, म्हणाले…
![“Even if not 3 but 30 parties come together….” Varun Sardesai criticizes MNS-BJP-Shinde group alliance, says…](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/collage-12.jpg)
एकनाथ शिंदेनी शिवसेनेबरोबर केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यातून आता अगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेविरोधात शिंदे गट आणि भाजपानेही कंबर कसली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदे गट, भाजपा आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाईंनी मनसे, भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “गेल्या ३० वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्होवो. ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत, असा खोचक टोला लगावला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुक शिवसेना जिंकणार…
शिवसेनेच्या निर्धार अभियानाची सुरुवात करण्यासाठी वरुण सरदेसाई सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. तुळजापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांनी अभियानाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा निवडणुका जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायला शिवसेना तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही केवळ लढणार नाही तर जिंकणार आहोत, असा विश्वास सरदेसाईंनी व्यक्त केला.
मनसे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट, भाजपा आणि मनसेत वाढत्या जवळीकीमुळे चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी गणेशोत्सव काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. अजूनही या भेटीगाठींचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
मनसे आणि शिंदे गटात जवळीक
शिंदे गट आणि मनसे युतीबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मोठ विधान केलं आहे. मनसे आणि शिंदे गटामध्ये जवळीक निर्माण झाली असल्याचे अमित ठाकरे म्हणाले आहेत. मात्र, युतीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेचं निर्णय घेतील असंही अमित ठाकरे म्हणाले.