पिंपरी फूलबाजारातील अतिक्रमण हटविले
अ क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई
![Pimpri, Flower Bazaar, Encroachment, Deleted,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Atikraman-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी फुलबाजारात अनधिकृतपणे फुटपाथवर अतिक्रम केलेल्या विक्रेत्यांवर कारवाईची कुर्हाड पडली आहे. रेल्वे स्टेशन बाजूच्या परिसरातील पिंपरी पोलिस चौकीपर्यंतची सर्व अतिक्रमण हटविण्यात आली आहेत. अ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे रस्ता वाहतुकीस मोकळा झाला.
पिंपरी फूलबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. या परिसरात रेल्वे स्टेशन असल्याने प्रवासी बाहेर आल्यानंतर गर्दी होत असे. येथील फूटपाथवरच काही विक्रेत्यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत होती. त्या बाबत सातत्याने परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत अ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
अनेक वर्षांपासून बस्थान मांडलेल्या टपर्या, पत्रा-शेड नेतानाबूत करण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अतिक्रमण निरीक्षक जयंत मरळीकर, बीट निरीक्षक अमित शिंदे, माधुरी पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या वेळी अतिक्रमणचे पोलीस पथक, महाराष्ट्र सुरक्षा जवान तसेच महापालिकेचे कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रस्त्यावर बसलेले सर्व अतिक्रमण हटवण्यात आले. अनधिकृतपणे बांधलेले पत्रा शेड जेसीबीच्या सह्यय्याने काढण्यात आले. विक्रेत्यांनी देखील सहकार्य करत दुकाने हटविल्याचे क्षेत्रीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.