‘एकनाथ खडसेंचा लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने त्याबाबत घोषणा केलीच नाही.
आता या सगळ्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे मी भाजप प्रवेशाच्या विषयावर फुली मारली आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत संकेत दिले आहेत.
हेही वाचा – ‘..तर मोदी सरकार कोसळेल’; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे.त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कधी आयोजित करणार, हे पाहावे लागेल. तसेच एकनाथ खडसे भाजपचा हा प्रस्ताव स्वीकारणार का, हेदेखील बघावे लागेल.





