अटक करताना आरोपीकडूनच गुप्तांगावर मारहाण, पोलिसाने थेट गोळीच मारली अन्…
![अटक करताना आरोपीकडूनच गुप्तांगावर मारहाण, पोलिसाने थेट गोळीच मारली अन्...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/अटक-करताना-आरोपीकडूनच-गुप्तांगावर-मारहाण-पोलिसाने-थेट-गोळीच-मारली-अन्.jpg)
लातूर : लातूरमधील एमायडीसी भागात रात्रीच्या सुमारास जीवघेणा थरार घडला. खुनाच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोपीने जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी स्वरक्षणार्थ आरोपीवर गोळी झाडली. यामध्ये आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील नारायण तुकाराम इरबतनवाड हा चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरार आरोपी असून तो लातूर शहारातील विश्वगंगा महाविद्यालयाजवळील कलाने बिल्डिंगध्ये असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली. त्यामुळे नारायण तुकाराम इरबतनवाड याला अटक करण्यासाठी पोलिसांनी इमारतीला घेराबंदी केली.
आरोपी तुकारामला ताब्यात घेत असताना आरोपीने पोलीस निरीक्षकांच्या गुप्तांगावर मारहाण करत त्यांच्याकडून पिस्तूल हिसकावण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे स्वसंरक्षणात पोलीस निरीक्षकांनी गोळी झाडली. आरोपीच्या कमरेखाली गोळी लागली असून त्याला उपचारासाठी लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.