नंबर प्लेट नसल्याने चारचाकी तपासणीसाठी थांबवली, पुढे जे घडलं ते धक्कादायकच…
![Due to lack of number plate, the four-wheeler was stopped for inspection, what happened next is shocking ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Due-to-lack-of-number-plate-the-four-wheeler-was-stopped-for-inspection-what-happened-next-is-shocking-....png)
जळगाव | नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत असताना एका चार चाकी वाहनावर नंबर प्लेट नसल्याने तिला कारवाईसाठी थांबवले. मात्र, संशय आल्याने चारचाकीची तपासणी केली असता तिच्यात गोण्यांमध्ये भरलेला तब्बल ५८ किलोग्राम एवढा साडेआठ लाख रुपयांचा गांजा मिळून आला आहे. चाळीसगाव धुळे रोडवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी रात्री ही मोठी कारवाई केली आहे. चारचाकीसह गांजा मोबाईलवर रोकड असा एकूण १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तुषार अरूण काटकर (वय-२८ रा. दत्तवाडी ता. चाळीसगाव) व सुनिल देविदास बेडीस्कर (वय-३८ रा. पिलखोड ता. चाळीसगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
असा आला संपूर्ण प्रकार उघडकीस…
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्मचारी सोमवारी सायंकाळी चाळीसगाव-धुळे रस्त्यावर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान धुळ्याहून चाळीसगावकडे जात असलेली एक विना नंबरची स्कार्पिओ गाडी आली. नंबर प्लेट नसल्याने या चारचाकीला कारवाईसाठी पोलिसांनी थांबवले. यावेळी चालक टाळाटाळ करायला लागला. संशय आल्याने पोलिसांनी वाहनातील व्यक्तींची व वाहनाची चौकशी केली. चार चाकीत चार गोण्यामध्ये भरलेला ५८ किलो २०० ग्राम एवढा ८ लाख ७२ हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला. गांजा, चार चाकी वाहन, चारचाकीत बसलेल्या दोघांकडील मोबाईल व रोकड असा एकूण १३ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. व तुषार अरूण काटकर (वय-२८ रा. दत्तवाडी ता. चाळीसगाव) व सुनिल देविदास बेडीस्कर (वय-३८ रा. पिलखोड ता. चाळीसगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे तुषार देवरे, पोलीस नाईक सचिन देविदास अडावदकर, बापू काशिनाथ पाटील, दिपक पितांबर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने चाळीसगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नेमका गांजा कोणत्या ठिकाणी जात होता यात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे हे पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे.