निवडणूक आयोगावर शंका; ६० लाख नवीन मतदार आले कुठून..? : नाना पटोले
नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात ६० लाख मतदार वाढले. हा आकडा संशयास्पद आहे. याच वाढीव मतांच्या भरवशावर महायुती जिंकली असून, आता आम्ही आमचा लढा लोकशाही वाचवण्यासाठी सुरू केला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमचे आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले.
आज मतदार दिनाचे निमित्त साधून काँग्रेसच्यावतीने शहरात आंदोलन करण्यात आले. मोदी आले तेव्हापासून देशातील लोकशाहीच धोक्यात आली आहे. निवडणूक आयोगही आता स्वायत्त संस्था राहिली नाही. याविरोधात आम्ही लोकांमध्ये जागृतीसह सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ९ कोटी ५४ लाख मतदारसंख्या निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. निवडणूक झाल्यावर आयोगाने मतदारांचा आकडा बदलला.
हेही वाचा – लाडक्या बहिणींचे ३० लाख अर्ज बाद होणार? आदिती तटकरे म्हणाल्या, “ऑक्टोबरमध्ये…”
६० लाख अधिकचे मते कुठून आलेत. त्याची माहिती आम्ही मागितली आहे. मात्र आयोग सांगण्यास नकार देत आहे. लाडक्या बहीण योजनेचा फायदा बांगलादेशी घेत असल्याचे सरकारचे म्हणणे असेल तर मतदानासाठी भाजपनेच त्यांना आणले होते का असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, संदेश सिंगलकर, प्रशांत धवड, कमलेश समर्थ, दिनेश बानाबाकोडे, विवेक निकोसे आदी उपस्थित होते.
आम्ही निवडणूक आयोगाला मतदारांच्या संख्येची आकडेवारी मागितली होती. त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र प्रश्न न विचारताच हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यानंतर आयोगाने त्यांचाच आकडा सांगितला. त्यावरून आयोगाला सरकारनेच स्क्रिप्ट लिहून दिल्याची शंकाही पटोले यांनी उपस्थित केली. लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी बघितल्यास ५ वर्षांत ५० लाख मतदार वाढल्याचे दिसून येते.
मात्र त्यानंतर पाच महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल ४६ लाख मतदार कसेकाय वाढू शकतात याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. आम्ही या विरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करताच आयोगाने आपल्या वेबसाइटवरून सर्व डाटा व आकडेवारी डिलीट केला असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. आमचा लढा लोकशाही वाचवण्यासाठी आहे. त्यामुळे बावनकुळेच नव्हे तर भाजपनेही आम्हाला या लढ्यात साथ द्यावी असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.