वर्षभरात डिजिटल पेमेंटमध्ये 40 टक्क्यांनी वाढ
![Digital payments up 40 percent year-over-year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/digital-payment-.jpg)
डिजिटल पेमेंटमध्ये 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेने मागील गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले. ही अनुकूल परिस्थिती कायम ठेवण्याची आणि या क्षेत्राला कर सवलत देऊन प्रोत्साहन देण्याची मागणी आता करण्यात येत आहे. जेटा बँकिंगचे अध्यक्ष मुरली नायर यांनी सांगितले की, 2021 हे वर्ष भारतीय फिनटेक आणि स्टार्टअप कंपन्यांसाठी अभूतपूर्व आहे. 2022-23च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या क्षेत्रातील मोठी वाढ लक्षात घ्यावी लागेल आणि नजीकच्या भविष्यात अशा वाढीसाठी या क्षेत्राला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
देशाचा अर्थसंकल्प सादर व्हायला आता काही दिवसांचा कालावधी उरला आहे. यातून आता फिनटेक आणि स्टार्टअप्सला सरकारकडून कर सवलत आणि सुविधा हव्या आहेत. यावर्षी 40 हून अधिक स्टार्टअप्सने युनिकॉर्न दर्जा मिळविला. इतकेच नव्हे तर 2021 मध्ये या उद्योगात प्रचंड वाढ झाली. फिनटेक उद्योगामुळे डिजिटल पेमेंट क्षेत्रात भारतात मोठी वाढ झाली. यावर्षी लोकांनी देयकांसाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल पद्धतींचा वापर केला. 2022-23 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या क्षेत्रातील मोठी वाढ लक्षात घ्यावी लागेल आणि अशा वाढीसाठी या क्षेत्राला प्रोत्साहन कायम ठेवावे लागेल, अशी मागणी होत आहे.